Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये अजिंठा-वेरुळचा समावेश

 

औरंगाबाद प्रतिनिधी । पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षेने अर्थसंकल्पात 17 प्रतिष्ठित स्मारक निश्चित केली असून, महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ या पर्यटन स्थळांचा देखील समावेश ‘आयकॉनिक’ स्मारकांमध्ये करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पातील १७ पर्यटन स्थळे ताजमहाल (उत्तर प्रदेश), फतेहपूर सिक्री (उत्तर प्रदेश), अजिंठा (महाराष्ट्र), वेरूळ (महाराष्ट्र), हुमायूँची कबर (नवी दिल्ली), लाल किल्ला (नवी दिल्ली), कुतुब मीनार (नवी दिल्ली), कोलवा बीच (गोवा), अमेर फोर्ट (राजस्थान), सोमनाथ (गुजरात), धोलावीरा (गुजरात), खजुराहो (मध्यप्रदेश), हम्पी (कर्नाटक), महाबलीपुरम (तामिळनाडू), काझीरंगा (आसाम), कुमाराकोम (केरळ), महाबोधी (बिहार) अशी आहेत. पर्यटन आणि संस्कृती यांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करणे, स्थानिकांचे कौशल्य विकसित करणे, स्थानिकांचा सहभाग वाढविणे, आणि स्थळाचे ब्रँडींग करणे या प्रमुख बाबींचा या योजनेत समावेश असेल. यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक शिवाकांत वाजपेयी म्हणाले की, या अर्थसंकल्पात देशभरातून १७ ‘आयकॉनिक’ स्मारके निश्चित करण्यात आली आहेत. या १७ पर्यटनस्थळांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. यासोबतच लोप पावत जाणाऱ्या आदिवासी संस्कृतीलाही उभारी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाला आहे. आदिवासींची संस्कृती, रीतीरिवाज जाणून घेण्यासाठी अनेक परदेशी अभ्यासक उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास ‘ट्राइब्स हेरिटेज’ची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी नक्की किती रुपयांची तरतूद केली, हे स्पष्ट केलेले नाही, पण यानिमित्ताने सध्या पर्यटनाच्या बाबतीत पिछाडीवर पडलेल्या औरंगाबादला आता पुन्हा नवी उभारी मिळेल आणि जागतिक नकाशावर औरंगाबाद पुन्हा एकदा झळकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version