Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मला स्वतःहून युती तोडायची नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

मुंबई प्रतिनिधी । मला स्वतःहून युती तोडायची नाही, युती कायम राहावी, ही माझी इच्छा आहे. सगळे गोडीने व्हायला पाहिजे. भाजपाध्यक्ष अमित शाहांसोबत 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. आता जो निर्णय असून भाजपने तो घ्यावा, अशी भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट इशारा भाजपला दिला आहे.

भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. ‘मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. समसमान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा,’ अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

‘सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतली तो सर्वांना मान्य असेल,’ असा एका ओळीचा ठराव या बैठकीत शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मान्य केला आहे. तसंच शिवसेना मुख्यमंत्रिपदच मिळावं, या मागणीबाबत सर्व आमदारांचं एकमत झालं आहे.

Exit mobile version