Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनतेच्या मनातला मी आमदार.! होय मला आमदार व्हायचंय – व्ही.पी. पाटील

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | 1980 पासून मी राजकारणात असून 1985 मध्ये भाजपामध्ये प्रवेश करून अनेक पदे भूषविली. 95 साली आमदारकीसाठी दावेदार असताना पक्षाने उमेदवारी दिली नाही. गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपाने तत्व सोडली म्हणून मीही 25 वर्षांपूर्वीच पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे पक्षाचे काम करीत आहे. चांगलं वकृत्व, स्वच्छ चरित्र व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मी सच्चा कार्यकर्ता म्हणून पक्षांकडे मी विधानसभेसाठी उमेदवारी मागणार असून पक्षाने मला न्याय द्यावा. जनतेच्या मनातला मी आमदार असून होय मला आमदार व्हायचंय असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व्ही .पी. पाटील सर यांनी जामनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.

व्ही.पी. पाटील सर पुढे म्हणाले की पक्ष प्रणालीवर माझा विश्वास राहिला नाही. सकाळी या पक्षात तर संध्याकाळी तो दुसऱ्याच पक्षात दिसतो ही प्रवृत्ती बळावत चालली आहे. अनेक आमदार खासदारांना देशाविषयी प्रेम शिल्लक राहिले नाही. त्यांच्यातही भ्रष्ट प्रवृत्ती बळावर चालली असून ई .डी., सीबीआय त्यांच्या मागे लागली आहे .आणि म्हणून मला हिंदुस्थानातला एक आदर्श आमदार व्हायचंय. भारतातल्या कोणत्याच आमदाराकडे नसेल असं व्हिजन माझ्याकडे आहे. असे सांगून पाटील सर म्हणाले की, या देशासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान दिले. असंख्य लोकांनी प्राणांची आहुती दिली. तेव्हा हा देश स्वतंत्र झाला. या देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी मी माझ्यापासून सुरुवात करेल .असा दृढ विश्वास व्यक्त करत पाटील सर पुढे म्हणाले की पैशाचा मला मोह नाही. राजकारणात पैसे व नाव कमावण्यासाठी मी राजकारण करत नाही नोकरीचा राजीनामा देऊन मी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेत गुंतवून ठेवले आहे. माझी प्रतिमा स्वच्छ असून जनतेच्या हृदयात मी आहे आणि म्हणून मी आमदारकी लढणारच. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही तर राजकीय संन्यास घेऊन उर्वरित वेळ, आयुष्य वाया घालवण्यापेक्षा स्वतःला समाजसेवेत गुंतवून घेईल असेही ते म्हणाले.

Exit mobile version