Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलजागृती सप्ताहानिमित्ताने उद्या शहरात जलदिंडीचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी)। जलजागृती सप्ताहानिमित्ताने शनिवार 16 मार्च, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी दिली आहे. शासनामार्फत जलजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 16 ते 22 मार्च, 2019 या दरम्यान लोकांच्या सहभागाने संपन्न होत आहे. जलजागृती अभियानाच्या जिल्ह्यातील कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने बाबा झुलेलाल मंदीर , सेवा मंडळ, सिंधी कॉलनी, जळगाव येथून होणार आहे. मंगल वाद्याच्या सुरात सिंधी कॉलनी, संत कंवरराम नगर येथून जलदिंडीस प्रारंभ होऊन पंचमुखी हनुमान मंदिर, इंडिया गॅरेज, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे पोहोचल्यानंतर जलदिंडी मधील कलशांचे एकत्रीकरण करुन (5 नद्यांचे पाणी) महाकलशाचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे हस्ते पुजन होणार आहे.

जलजागृती अभियानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याहस्ते जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हे राहणार आहेत. या जलदिंडीमध्ये शहरातील विविध शाळांचे 500 विद्यार्थी व राज्य शासनाचे 300 अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version