प्रवाशांशी हुज्जत; रावेर डेपोचा चालक निलंबीत

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबविता त्यांच्याशी हुज्जत घातल्या प्रकरणी रावेर डेपोच्या एसटी ड्रायव्हरला निलंबीत करण्यात आले आहे.

रावेर भुसावळ येथून रावेरकडे येणार्‍या बसला हात दाखवून ही चालकाने गाडी थांबवली नव्हती. सावदा येथे येत या महीला प्रवाशांनी चालक टी. आर. शेख यांना याबाबत जाब विचारला असता त्याने या महीला प्रवाशांशी हुज्जत घालत उर्मट व असभ्य भाषा वापरल्याने चालकाची तक्रार जळगाव येथील विभागीय नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली होती. याची तात्काळ दखल घेत रावेर डेपोचे चालक टी. आर. शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी रावेर डेपोची बस (क्रमांक २३९८) भुसावळ येथून रावेरकडे येत होती. त्यावेळी गांधी पुतळ्याच्या जवळ काही महीला प्रवाशांनी बसला हात दाखवून थांबविण्याची विनंती केली.मात्र चालक शेख मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याने त्यांनी बस थांबवली नव्हती. मागून आलेल्या जळगाव तांदलवाडी बसने या महीला सावदा येथे आल्या. त्यावेळी उभ्या असलेल्या बस चालक शेख यांना बस का थांबवली नाही अशी विचारणा केली असता शेख यांनी महिलांवर ओरडून त्यांचा अपमान केला होता.

या प्रकरणी विभागीय नियंत्रक यांनी तात्काळ दखल घेऊन संबधीत चालक टी. आर. शेख यांना निलंबित केले आहे. यामुळे येथील आगारात खळबळ उडाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत शेख यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content