Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पर्यावरण वाचविण्यासाठी आव्हाणे येथे मानवी साखळी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 27 at 6.41.23 PM

जळगाव, प्रतिनिधी | हवामान बदलाच्या प्रश्नावर जगभरातील शासनाचे लक्ष वेधणाऱ्या व ग्रेटा थन्बर्गच्या समर्थनासाठी आव्हाणे येथील शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांनी व युवकांनी रस्त्यावर उतरत गिरणा नदी वाचविण्याचा संकल्प केला. तसेच दोन किमीपर्यंत मानवी साखळी तयार करत नागरिक व प्रशासनाचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आव्हाणे हायस्कूलपासून या उपक्रमाला सुरुवात झाली. शानूबाई पुंडलीक चौधरी हायस्कूल, आचार्य गुरुकुल, जि.प.शाळा आव्हाणे येथील शेकडो विद्यार्थ्यांसह वंदे मातरम युवा संघटना, मोरया ग्रृप, लालवटा ग्रृप, आव्हाणे फर्स्ट चे युवक देखील मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.

गिरणा नदीत होत असलेला अवैध वाळू उपसा व त्यामुळे नदीचे होत असलेली दुर्दशा याकडे विद्यार्थ्यांनी उपस्थितांसह नागरिकांचे लक्ष वेधले. ग्रेटाने सुरु केलेल्या ‘फ्राईडे फॉर फ्युचर’ अंतर्गत सोशल मीडियावर देखील आव्हाण्याचे आंदोलनाची दखल घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वुई आॅल ग्रेटा’ च्या जोरदार घोषणा देत ग्रेटाच्या आंदोलनाला पाठींबा दिला. ‘पर्यावरण बचाव, गिरणा बचाव’, ‘सामील व्हा, सामील व्हा’, गिरणेसाठी सामील व्हा, अशा घोषणांनी संपुर्ण आव्हाणे परिसर दणाणून सोडला होता. हवामान बदलाबाबत राष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या गिरीश पाटील या युवकाने देखील या आंदोलनात सहभाग घेतला. पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हर्षल चौधरी यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासह दीशा बहुउद्देशिय संस्थेचे विनोद ढगे व कलावंतांनी यावेळी प्लास्टिक मुक्ती व स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मनपाचा बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या वायू प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, हा प्रकल्प त्वरित बंद करून या ठिकाणी कचरा टाकणे बंद करण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली. आव्हाणे फाटा ते कानळदा रस्त्यालगत विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली होती.

ग्रामीण भागातील पहिलेच आंदोलन
‘फ्राईडे फार फ्यूचर’ अंतर्गत ग्रेटाला जगभरातून समर्र्थन मिळत आहे. राज्यात देखील मुंबई व पुणे वगळता कोणत्याही मोठ्या शहरात हे आंदोलन झालेले नाही. ग्रामीण भागातून ग्रेटाला पहिल्यांदाच पाठींबा मिळाला असून, आव्हाणे येथील आंदोलन हे क्लायमेटस्ट्राईक यामध्येही ट्रेंड करत होते.

Exit mobile version