Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाडशाखीय वाणी समाजातर्फे गुणगौरव

यशस्वी होण्यासाठी स्वत:ला झोकून द्या : आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांचे प्रतिपादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यू प्रतिनिधी । शहरातील लाडशाखीय वाणी विकास मंडळाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच घेण्यात आला. गणपती नगरातील सुमंगल कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष मेजर नाना वाणी होते. दरम्यान, जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:ला झोकून द्या, असे आवाहन आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांनी केले.

कृषी विभागा अंतर्गत आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, नांदुरा, जि. बुलढाणा येथील अतिरिक्त तहसीलदार जीवन रवींद्र मोराणकर, समाजाचे युवा नेते व शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमोद चांदसरकर, ॲड. एम. आर. शिरोडे, ॲड. एस.के. शिरोडे, सुमंगल महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा शिरोडे, युवा मंचचे अध्यक्ष योगेश चिंचोले, युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर अमृतकर, उपस्थित होते.

यशस्वी होण्यासाठी स्वत:ला झोकून द्या आणि कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, असे अनिल भोकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यासात सातत्य आवश्यक आहे, असे मोराणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. समाजाने सत्कार केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राजू क्षीरसागर व सहकारी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. दिवंगतांना श्रद्धांजली वाहून इस्त्रो शास्त्रज्ञांचे चांद्रयान-3 अभियान यशस्वी केल्यामुळे त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन केले.  यावेळी नामवंत पुरोहित श्रीकांत रत्नपारखी यांच्या कन्या राजेश्वरी व ज्ञानेश्वरी रत्नपारखी यांनी अप्रतिम बासरी वादन केले.  यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोठावदे यांनी, तर शांतीलाल नावरकर यांनी आभार मानले.  अनिल भोकरे यांचा परिचय सुप्रिया चांदकरकर यांनी, तर जीवन मोराणकर यांचा परिचय उद्धव कोठावदे यांनी करून दिला.  बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कोठावदे, सुजाता पाखले यांनी केले. संजय येवले, भूषण अमृतकर, किशोर चिंचोले, पंकज बाविस्कर यांच्यासह लाडशाखीय वाणी विकास मंडळ, युवा मंच, युवा फाऊंडेशन व सुमंगल महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version