Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने वारिशे व कांबळे यांना आदरांजली

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.तर दैनिक सम्राट वृत्तपत्राचे मालक संपादक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

येथील विश्रामगृहात नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकारांची होणारी मुस्कटदाबी थांबवावी अशी मागणी करण्यात आली. तर संपादक बबन कामळे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भितीची भावना निर्माण होत आहे.अशी प्रतिक्रिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेशदादा पेठकर यांनी व्यक्त केली
महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथील पेट्रोल पंपातून आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना भरधाव वेगाने येणार्‍या महिंद्रा थार गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांतने ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करून, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक जलदगती न्यायालयामार्फत कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे.

पत्रकारांचा विविध पध्दतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारांवर होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा या वेळी सर्व पत्रकार बांधव यांनी दिला.

राज्यात गेल्या दहा दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी मागणी सोमवार दिनांक १३ रोजी नांदुरा तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात येणार आहे या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेशदादा पेठकर, उपाध्यक्ष गणेश आसोरे, सचिव पुरुषोत्तम भातुरकर,कोषाध्यक्ष तुकाराम रोकडे,, सुहास वाघमारे,विनोद गावंडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version