Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहिवद विकासो सोसायटीत बळीराजाच्या पॅनलचा ऐतिहासिक विजय

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिवद विविध कार्यकारी सोसायटीच्या सन 2022 ते 2027 च्या तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणुक झाली. यात पॅनलप्रमुख प्रविण माळी यांच्या नेतृत्वात बळीराजा पॅनलने तेराच्या तेरा जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला.

गावातील जातीयवादाला मूठमाती देण्यासाठी गावातील बहुतांश लोकांनी पॅनलचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते प्रविण माळी यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला होता. दहिवद गावाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच माळी समाजाकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली होती. गावातील मराठा समाजाने देखील त्यांच्या नेतृत्वाला साथ दिली. उद्योजक दिनेश पाटील यांनी गावातील संपूर्ण समाजाची तसेच इतर समाजाची मदत त्यांच्या मागे ताकदीनिशी उभी केली.

या निर्णयाला आणि पहिल्यांदा माळी समाजाला राजकीय नेतृत्व देण्याचा मनाचा मोठेपणा सर्वांनी दाखवला. विजयी उमेदवारांमध्ये अलका पाटील, सुनीता पाटील या महिला सदस्यांनी देखील मोठी साथ दिली. त्यासोबतच राजेंद्र पाटील, ईश्वर माळी, संजय माळी, शांताराम माळी, सुरेश माळी,सुरेश माळी, जगदीश देसले, अशोक पाटील, रणजित पाटील,गुलाब धनगर ,जोगीलाल पारधी (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले. यामुळे प्रविण पाटील यांच्या बळीराजा पॅनलचे सर्व उमेदवार तीन पट मतांनी विजयी झाले; तर लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील यांच्या पॅनलचे संपूर्ण उमेदवार पराभूत झाले.

यावेळी माजी जि.प. सदस्य ए.टी.पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तर सुभाष देसले, गोकुळ माळी, जयवंत पाटील, शिवाजी माळी, अनिल माळी, पन्नालाल मावळे, शिवाजी पारधी तसेच दहिवद खुर्दचे शिरीष पाटील, हिरालाल पाटील, विनोद पाटील यांनी ही अनोखी युती यशस्वी करुन दाखवली. उपसरपंच देवानंद बहारे यांच्यासह बारा ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा दिला तसेच  दहिवद व दहिवद खुर्द गावातील राजकीय, सामाजिक प्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.

यापुढील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रवीण माळी यांच्या नेतृत्वालाच ग्रामस्थ सर्व प्रकारची मदत करणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. ‘गाव करी ते राव काय करी’ असं म्हणतात. म्हणून गावातील लोकांच्या मताप्रमाणे प्रवीण माळी पुढील गाव विकासाचे नेतृत्व करतील आणि सर्वांची साथ असेल. असे उद्योजक दिनेश पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version