Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऐतीहासीक क्षण : ‘चांद्रयान-३’चे यशस्वी लँडींग; देशभरात जल्लोष !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राच्या इतिहासातील अतिशय महत्वाचा टप्पा  मानल्या जाणार्‍या ‘चांद्रयान-३’ हे यान  चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले असून यामुळे देशभरात प्रचंड जल्लोष करण्यात आला आहे.

 

मिशन चांद्रयान-३ आज चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले होतेे. विहीत कार्यक्रमानुसार विक्रम लँडरने संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लँडिंग यशस्वी होईल, असा दावा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आधीच केला होता. आतापर्यंत अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि रशियाने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले असून  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा जगातील एकमेव देश बनला आहे. देशाच्या अंतराळ संशोधनातील हा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

 

आज सकाळपासूनच चांद्रयानबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती. देशभरात या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ठिकठिकाणी पूजा-पाठ केले जात होते. तर हजारो ठिकाणी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सुविधा करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने आज सायंकाळी साडेपाच पासून चांद्रयान लँडींगचे प्रक्षेपण सुरू झाले. आणि या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडींग करताच इस्त्रोने एका अध्यायाची नोंद केली आहे.

 

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे आयुष्य पृथ्वीच्या १४ दिवसांइतके सांगितले जात आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सौरऊर्जेतून चंद्रावर ऊर्जा मिळवून त्यांचे मिशन पूर्ण करतील. अशा स्थितीत १४ दिवसांनंतर जेव्हा चंद्राच्या या भागावर अंधार पडेल तेव्हा हे अभियान संपुष्टात येणार आहे. या १४ दिवसांमध्ये इस्त्रोच्या संशोधकांना अतिशय महत्वाची माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version