सावधान जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट : सावधगिरीचा इशारा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात तीन दिवसाच्या कालावधीत हवामान विभागाने उष्णता लाट असल्याबाबतचा इशारा दिला आहे. जिल्हावासीयांनी सावधगिरी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची दहकता वाढली असून मार्च माहिन्याच्या अखेरीस म्हणजे २९, ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात उष्णता लाट असल्याचा इशारा हवामान विभागाने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

 

काय करावे

१. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

२. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

३. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा.

४. प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

५. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.

६. शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.

७.अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

८. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे.

९. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात.

१०. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

११. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

१२. सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

१३. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

१४. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

१५. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

१६. रस्ताच्या कडेला उन्हापासुन संरक्षणाकरिता शेड उभारावेत.

१७. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावा.

 

काय करु नये

१. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

२. दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

३.गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

४. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२  ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.

५. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी.

Protected Content