Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी महाविद्यालयात विद्यार्थींनीना दिले आरोग्य व सबलीकरणाचे धडे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘‘सध्या बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, मोबाईल व इतर तंत्रज्ञानाचा अतिवापर, ताणतणाव यामुळे महाविद्यालयीन युवतींच्या लाइफस्टाइलवर नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवतींनी डॉक्टर व इतर मार्गदर्शकांकडून माहिती घेऊन आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करून काळजी घ्यावी, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिप्ती पायघन व समुपदेशन तज्ज्ञ हेमा अमळकर यांनी केले.

 

येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शनिवार ता. ५ रोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसाठी काम करणाऱ्या “पिंक हॅट्स क्लब”च्यावतीने ‘लाइफस्टाइल मॉडिफिकेशन इन कॉलेज गर्ल’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, स्त्रीरोग तज्ज्ञ सोसायटीच्या सचिव डॉ.दिप्ती पायघन, विवेकानंद प्रतिष्ठानच्या संचालिका सौ. हेमा अमळकर, प्रा. ज्योती जाखेटे हे उपस्थित होते.

 

यावेळी कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, महिलांनी स्वाभिमानी असावे. त्यासाठी आत्मविश्वास असायला हवा. आत्मविश्वासासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे, तसेच महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील, तर त्या अधिक आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम होतात, त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे फार आवश्यक आहे तसेच आई-वडिलांचे संस्कार मोलाचे असतात सर्वांनी ते जपले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यानंतर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दिप्ती पायघन यांनी नमूद केले कि, अलीकडे धकाधकीच्या जीवनामुळे महाविद्यालयीन युवतींचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे, जीवनशैलीत योग्य ते बदल करून मुलींनी आहार, विहार, निद्रा यांच्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच नियमित व्यायाम देखील केले पाहिजे आरोग्य चांगले राहिले तरच जीवन यशस्वी होऊ शकते. हे लक्षात घेऊन मुलींनी खबरदारी घेणे गरजेचे असून सुदृढ आरोग्य हाच जीवणाचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी म्हटले.

 

यानंतर समुपदेशन तज्ज्ञ  हेमा अमळकर यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात नमूद केले कि, भारताला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर भारतातील महिलांना सुरक्षा प्रदान करणे गरजेचे आहे. त्यांना आत्मविश्वास आणि त्यांच्यातील गुणांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयीन युवतींनी ‘आपल्या उद्दिष्टापासून विचलित होवू नका, आपल्या धेय्यावर ठाम रहा’ असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनल पाटील यांनी तर आभार प्रा. कल्याणी नेवे यांनी मानले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय “पिंक हॅट्स क्लब”च्या सहकारी प्राध्यापकांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले

Exit mobile version