चाळीसगावात सराफा दुकानातून साडेसहा लाखाचे दागिने लांबविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील सराफा दुकानात अज्ञात दोन जणांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणाकरून सुमारे ६ लाख ६१ हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुकान मालक यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरुण मुरलीधर बाविस्कर (वय-७१) रा. राजेंद्र प्रसादरोड, पीपल्स बँकेजवळ चाळीसगाव यांचे त्यांच्या घरासमोर उदय ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. काल ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दोन व्यक्ती त्यांच्या दुकानावर आले. आपण ग्राहक असल्याचे भासवून त्यांनी सोन्याचे दागिने पाहण्यासाठी घेतले. दोन्ही संशयितांनी ७० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याची चैन, १ लाख ७१ हजार ५०० रुपये किंमतीचे विविध कानातले दागिने, ९८ हजार रुपये किंमतीची पांचाली ७३ हजार ५०० किंमतीच्या सोन्याचे पेंडल, २ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचे ७१ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या वाट्या असा एकूण ६ लाख ६१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने दुकानदार अरुण बाविस्कर यांची फसवणूक करून लंपास केले आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांनी भेट दिली. तसेच पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चौकशी केली. अरुण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राहुल सोनवणे करीत आहे.

Protected Content