Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टोपी आणि शिट्टी देतो, देशाची चौकीदारी करा : अकबरुद्दीन ओवेसी

हैदराबाद (वृत्तसंस्था) एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. ‘पंतप्रधानांना चौकीदार शब्द एवढाच आवडत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे. त्यांना मी चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देईन,’ असा टोला अकबरुद्दीन ओवेसी यांनी हाणला आहे.

 

ओवेसी पुढे म्हणाले की, चहावाला बनून त्यांनी देशाची दिशाभूल केली. आता चौकीदार बनून पुन्हा ते तेच काम करत आहेत. मोदी जेव्हा चहावाला झाले. त्यावेळी मी म्हटले होते की, चहाची किटली, चुल मी देईन, चहा त्यांनी बनवून आम्हाला द्यावा. मोदी असे व्यक्ती आहेत, जे कधी नाल्यातील गॅसवर पकोडे बनवतात. आता ते चौकीदार झाले आहेत. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन. मोदींनी टोपी आणि गळ्यात शिट्टी बांधून देशाची चौकीदारी करावी. ‘जो माणूस मतं मिळविण्यासाठी कधी चहावाला बनतो तर कधी फकीर. तर कधी नाल्यातून गॅस काढतो. अशा लोकांना तुम्ही मतं कशी देता?’ असा सवाल करतानाच ‘आधी त्यांनी स्वत:ला चहावाला म्हटले. तेव्हा त्यांना मी चहाची किटली आणि चूल देणार होतो. चहापत्तीही देणार होतो. आता मात्र ते चौकीदार बनले आहेत. ठिक आहे. चौकीदार तर चौकीदार. चौकीदार बनण्याची त्यांना एवढीच आवड असेल तर त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देण्यासही मी तयार आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version