Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरियाणातील भाजप खासदाराच्या ताफ्यातील गाडी आंदोलकांमध्ये शिरली !

 

अंबाला वृत्तसंस्था | एकीकडे लखीमपूर खेरी येथील घटनेमुळे निर्माण झालेला तणाव निवळला नसतांना हरियाणातही भाजप खासदारातील ताफ्यातील कार शेतकरी आंदोलकांमध्ये शिरल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

हरियाणातल्याअंबाला जिल्ह्यातील नारायणगडमध्ये गुरुवारी एका पुरस्कार सोहळ्यासाठी क्रीडामंत्री संदीप सिंह आणि कुरुक्षेत्रचे भाजपा खासदार नायब सैनी पोहचले होते. यावेळी काही शेतकर्‍यांनी जोरदार घोषणा दिल्या आणि रस्ताही बंद केला. मात्र यावेळी सुरु असणार्‍या आंदोलनामध्ये सैनी यांच्या ताफ्यातील एका गाडीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या आंदोलकाला धडक दिली असून यात एक शेतकरी जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. या ठिकाणी आंदोलक जमा झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला. मात्र शेतकर्‍यांना गाडीने उडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आता केला जातोय.

हरियाणा कॉंग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुनही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर निशाणा साधण्यात आलाय. कुरुक्षेत्रचे भाजपा खासदार नायब सैनी यांच्या ताफ्याने अंबालामधील नारायणगडमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर गाडी चढवली. अशा अमानवीय कृत्यासाठी जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. शेतकर्‍यांवरील अत्याचार हे सहन करण्याच्या पलीकडे गेले असून भाजपाला अहंकाराची नशा चढलीय, अशा शब्दात कॉंग्रेसने टीका केलीय. यामुळे लखीमपूर खेरीच्या पाठोपाठ आता हरियाणातील ही घटना देखील राजकीय मुद्दा बनण्याचे संकेत मिळाले आहेत.

Exit mobile version