Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरीभाऊ जावळेंना तिकिट मिळाल्याने गावगप्पांना पूर्णविराम !

haribhau jawale

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । ना. हरीभाऊ जावळे यांचे तिकिट कापले जाणार असल्याची आवई उठवणार्‍यांना त्यांचे पहिल्याच यादीत नाव आल्याने आज चांगलीच चपराक बसली असून याबाबत सुरू असलेल्या गावगप्पांना विरामदेखील मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीआधी आ. हरीभाऊ जावळे यांना कृषी संशोधन व विकास परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले. या माध्यमातून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने रावेर-यावल मतदारसंघात आनंद व्यक्त करण्यात आला. तथापि, आधीच मंत्रीपदाचा दर्जा देऊन भाजप श्रेष्ठींनी त्यांचा पत्ता कापल्याची पुर्वतयारी केल्याची आवई मतदारसंघात उठविण्यात आली. एवढेच नव्हे तर जावळेंना उमेदवारी मिळणार नाही हे गृहीत धरून अचानक मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांच्या संख्येत वाढदेखील झाली. पारंपरीक आणि डिजीटल प्रसारमाध्यमांमधून संबंधीतांनी चांगलीच चमक दाखविण्यास प्रारंभ केला. काहींनी तर आपण दिल्लीतून उमेदवारी पक्की करत अर्ज भरण्याची तयारीदेखील केली होती. तथापि, हरीभाऊ जावळे यांनी या प्रकरणी कोणताही खुलासा न देता प्रचार मोहीम सुरू ठेवली. यातच त्यांना भाजपच्या पहिल्याच यादीत स्थान मिळाल्याने संबंधीत इच्छुकांसह अफवाबाजांचा रसभंग झाला असून याबाबत सुरू असणार्‍या गावगप्पांना विराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचे ना. हरीभाऊ जावळे व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. अपक्ष अनिल चौधरी, एमआयएमचे विवेक ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे हाजी सैयद मुश्ताक सैयद कमरूद्दीन तसेच अन्य उमेदवारदेखील रिंगणात राहणार आहेत. यात बाजी कोण मारणार हे लवकरच समजणार आहे.

Exit mobile version