Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दहा लाख रूपये देवूनही पुन्हा पैश्यांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यवसाय करण्यासाठी १० लाख रुपये देऊन पुन्हा पैश्यांची मागणी करून विवाहितेला छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ‘पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीतील माहेर असलेल्या अश्विनी राहुल चिंचाळे (वय-२५) यांचा विवाह शहरातीलच कांचन नगरात राहणारा राहुल सुभाष चिंचाळे यांच्याशी मार्च २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविले. त्यानंतर सासू, सासरे, माम सासरे, मावस सासू आणि आते सासू यांनी विवाहितेला स्वयंपाकाच्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच हुंड्यात काहीही दिले नसल्यामुळे माहेरहून २ लाख रुपये आणायचे सांगितले.

त्यानुसार विवाहितेने माहेरहून २ लाख रुपये रोख त्यांना दिले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला काही दिवस चांगले वागवले. पुन्हा पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ८ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार ऑनलाइन पद्धतीने ८ लाख रुपये देण्यात आले. एवढ्यावरच न थांबता सासरच्या मंडळींनी अजून पुन्हा १० लाखाची मागणी केली. दरम्यान या छळाला कंटाळून विवाहिता इंद्रनील नगर येथे माहेरी निघून आल्या. गुरुवारी, २८ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीवरून पती राहुल सुभाष चिंचाळे, सासरे सुभाष दंगल चिंचाळे, सासू नलिनी सुभाष चिंचाळे, जेठ प्रमोद सुभाष चिंचाळे सर्व रा. कांचन नगर, मावस सासू प्रमिला सुकलाल कोळी, आते सासू सुनिता सुरेश सैंदाणे दोन्ही रा. मलकापूर आणि  माम सासरे मुकेश नागो सोनवणे रा. वडनगरी ता. जळगाव यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.

Exit mobile version