Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हैदराबाद प्रकरण; चकमकीची चौकशी करून लवकरच अहवाल सादर होणार

SupremeCourtofIndia

नवी दिल्ली वृत्तसंस्था । हैदराबादमध्ये पशुचिकित्सक डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील चार आरोपींच्या पोलिस चकमकीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन आयोग स्थापन केला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा आयोग या चकमकीची चौकशी करून सहा महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रेखा बलदोता आणि सीबीआयचे माजी संचालक डी. आर. कार्तिकेयन आयोगाचे अन्य सदस्य असतील. या आयोगासाठी हैदराबाद येथे कार्यालय बनवून सर्व सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येईल. आयोगाचा पूर्ण खर्च तेलंगण सरकारला उचलावा लागणार आहे. न्या. सिरपूरकर ठरवतील, तेव्हापासून ही चौकशी सुरू होईल. या तीन सदस्यीय चौकशी आयोगाला सहा महिन्यांच्या आत अहवाल सादर करायचा आहे.

हे बनावट चकमकीचे प्रकरण असून या घटनेत सामील असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे विधिज्ञ जी. एस. मणी आणि प्रदीपकुमार यादव यांनी केली आहे. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या चकमकीची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी विधिज्ञ मनोहरलाल शर्मा यांनी आपल्या याचिकेत केली आहे. पोलिस चकमकीत ठार झालेल्या सर्व चारही आरोपींच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संकेत देण्यात आले होते.

Exit mobile version