Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी

haidrabad encounter news

हैदराबाद वृत्तसंस्था । हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारणारे ४ आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले. याप्रकरणाची तेलंगाणा सरकारने 8 सदस्यांच्या विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे.

हैदराबाद एन्काऊंटरविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मानव हक्क आयोगाने देखील याप्रकरणी चौकशी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने देखील अखेर एसआयटीची नेमणूक करत एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे या टीमचे नेतृत्व महेश भागवत या एका मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे असणार आहेत. भागवत रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या काम करत आहेत. या टीमकडे एन्काऊंटरचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करण्याचे काम राहणार आहे.

तेलंगाणा उच्च न्यायालयात आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणी आज 9 डिसेंबर सुनावणी होणार आहे. तेलंगाणा उच्च न्यायालयाने याआधीच हैदराबाद एन्काऊंटरमधील आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होऊपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ही वेळ आज रात्री 8 वाजता संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) 7 सदस्यीय पथकाने बलात्कार झालेले ठिकाण आणि एन्काऊंटर झालेल्या स्थळाचीही शनिवारी (7 डिसेंबर) पाहणी केली. दरम्यान, तेलंगाना पोलिसांनी चारही आरोपींविरोधात चौकशी करताना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version