Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय तंत्रनिकेतन येथे बुद्धिबळ आणि कॅरमच्या एच-झोन विभागीय स्पर्धा

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजच्या या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्याना फक्त अभ्यासाचे शिक्षण असून चालणार नाही तर एक परिपूर्ण व्यक्ती होण्यासाठी खेळ सुद्धा आवश्यक आहेत, केवळ पुस्तके वाचणे आणि अभ्यास करणे हे पुरेसे नाही. खेळ हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे, यामुळे आपल्या शरीरास शारीरिक आणि मानसिक वाढ होण्यास मदत होते. यशस्वी व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक असते त्यासाठी खेळ हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. आपल्या शालेय काळापासून मानसिक वाढ सुरू होते, परंतु आपण खेळाद्वारे करीत असलेल्या शारीरिक विकासासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.

याच उद्देशान्वये शासकीय तंत्रनिकेतन खामगांवद्वारे दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे एच-झोन आयईडीएसएसए अंतर्गत बुद्धिबळ आणि कॅरमच्या विभागीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत विभागातील प्रत्येकी २५ चमूंनी म्हणजेच एकूण ५० चमूंनी भाग घेतला होता.

८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन व्ही. एन. आय. टी. नागपूर येथील रजिस्ट्रार डॉ. एस. एम. देशमुख यांचे हस्ते फित कापून झाले. यावेळेस संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे, जिमखाना उपाध्यक्ष प्रा राजेश मंत्री, सचिव प्रा सागर जुमडे, खेळ प्रभारी प्रा. संदीप बरडे, आयोजन समिती समन्वयक प्रा. परांजपे व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच दीपक चव्हाण (बुद्धिबळ) आणि प्रा. राजकुमार फाटे (कॅरम) हे लाभले होते. त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या पंचगिरीमुळे स्पर्धेदरम्यान कुठलाही वाद उत्पन्न झाला नाही. या स्पर्धेच्या आयोजनात गो. से. महाविद्यालयाचे डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन डॉ. अनुराग बोबडे आणि अरजण खिमजी नॅशनल हायस्कुलच्या प्राचार्या डॉ प्रविणा शाह मॅडम व गुजराथी सर, चव्हाण सर व बोरसल्ले सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेत आयोजक शासकीय तंत्रनिकेतन खामगांव हे कॅरमचे विजेते ठरले तर अग्निहोत्री कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा हे उपविजेते ठरले. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत डॉ पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती हे विजेते ठरले तर शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूर हे उपविजेते ठरले.

संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांचे हस्ते सायंकाळी बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सुरस असे सूत्रसंचालन प्रा. गजानन पद्मणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा संदीप बरडे यांनी केले. आयोजनाविषयी विस्तृत माहिती प्रा. राजेश मंत्री यांनी दिली तर अध्यक्षीय समारोपाचे आणि खेळाडूंचे मनोबल वाढविणारे मार्गदर्शन प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी केले. बक्षिस वितरण समारंभाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

या भव्य दिव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विद्यार्थी समिती सचिव श्री शिवम खेतान, विद्यार्थी खेळ प्रभारी श्री सतीश ठाकरे व  ऋषभ बोचरे आणि ७० हुन अधिक स्वयंसेवकांनी अथक मेहनत घेतली. जिमखाना सहायक  ढोके व मदतनीस श्री सुरेश ठाकरे यांची अत्यंत मोलाची साथ लाभली. ची पराकाष्ठा केली.

Exit mobile version