Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी : असे आहेत नियम !

school 1

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारच्या निर्णयानुसार उद्यापासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग भरविण्यात येणार असून यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेल्यांनाच शाळा-कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे, असे त्यात म्हटले आहे. शाळेतील परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम, ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.

यासोबत, शिक्षक-पालक बैठकादेखील शक्यतो ऑनलाइन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

शाळेत आणि परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दररोज दोन सत्रांमध्ये भरवण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी, असे त्यात बजावण्यात आले आहे. या सर्व नियमांचे पालन करून उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत.

Exit mobile version