Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेकरीता उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-2020 शनिवार, (दि. 4 सप्टेंबर), रोजी सकाळी 11 ते सकाळी 12 या वेळेत जळगाव शहरातील 35 उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून परिक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन सूचना जाहिर करण्यात आला आहे.  

या परीक्षेकरीता जिल्ह्यातून 11 हजार 463 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. या परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण 1 हजार 130 इतक्या अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षेसाठी विहित उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपुर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

उमेदवारांसाठी विशेष सुचना

प्रत्येक परीक्षेच्या उमेदवाराने संबंधित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र (डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणणे सक्तीचे आहे. विषयांकित परीक्षा यापुर्वी रविवार, 11 एप्रिल, 2021 रोजी घेण्याचे नियोजित होते व त्यानुसार सदर परीक्षेचे प्रवेशासाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र प्रस्तावित 4 सप्टेंबर, 2021 रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही,

परीक्षा कक्षात प्रवेश करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मुळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परिक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मुळ ओळखपत्र तसेच त्याची एक रंगीत छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्युटुथ, दुरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर इ. साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे. आयोगाने परवानगी नाकारलेली कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशव्दारजवळ ठेवावे लागेल व त्यासाधन/साहित्याची सुरक्षिततेची जबाबदारी संबंधिताची राहील.

उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा/अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी आहे. परीक्षा केंद्रात काळ्या शाईचे बॉल पॉईट पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र मूळ ओळखपत्र व त्याची रंगीत छायांकित प्रत तसेच ओळखीच्या पुराव्याचे मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सुचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.

ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा 38 डिग्री सेल्सिअस अथवा 100.4 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार यांनी आरोग्यसेतू ॲप डाऊनलोड करण्यात यावे.

या परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी/कर्मचरी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे. बेसिक कोविड किट (bck) परीक्षेकरीता उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरीता एक. Extra protective Kit &(EPK) परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी एक. Personal Protective Equipment Kit (ppek) फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांकरीता, प्रत्येक 50 उमेदवारामागे 1 या संख्येत तसेच लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त समवेक्षकासाठी एक. विद्यार्थ्याने परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्यांचे प्रवेश प्रमाणपत्र हे पास म्हणून गृहीत धरण्यात येईल. जळगाव शहरातील परिक्षा केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेली शाळा/ महाविद्यालय परीक्षेच्यापूर्व तयारीसाठी व परिक्षेसाठी खुली राहतील.

परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरीता आयोगामार्फत पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्य संदर्भात परिक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेवून त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. या परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. असेही निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Exit mobile version