पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

 

ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपासून ते राज्यातील विविध मंत्री, जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपासून ते सामान्य शिवसैनिकांपर्यंत तसेच समाजातील प्रतिष्ठीतांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या पाळधी या गावी ना. पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. तर त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ आदींचा समावेश होता. तर वाढदिवसाचेच औचित्य साधून जिल्ह्यातील आठ नगरपालिकांना मिनी फायर फाटरचे आणि पाळधी ग्रामपंचायतीला कचरा वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरचे लोकार्पण देखील ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोविडच्या आपत्तीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. यंदा देखील फक्त सामाजिक उपक्रमांमधूनच आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले होते. यानुसार गेल्या तीन दिवसांपासून जळगाव ग्रामीण मतदारसंघात विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आज वाढदिवसाच्या दिवशी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सकाळी देवदर्शन केल्यानंतर पाळधी येथील आपल्या संपर्क कार्यालयाच्या जवळच शुभेच्छा स्वीकारल्या. प्रारंभी त्यांची लाडू तुला करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतांश मंत्र्यांनी दूरध्वनीवरून ना. गुलाबराव पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. जिल्ह्याचा विचार केला असता माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तर सर्वपक्षीय नेते व पदाधिकार्‍यांनी ना. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचे कृषी मंत्री ना. दादा भुसे यांनी दुपारी पाळधी येथे येऊन ना. गुलाबराव पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. जिल्ह्यातील विविध अधिकार्‍यांनी देखील पालकमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले. यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, एसपी डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह विविध खात्यांच्या अधिकार्‍यांचा समावेश होता.

दोन रक्तदान शिबिर

पाळधी दूरक्षेत्र, पत्रकार संघ आणि मुक्ती फाऊंडेशन यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुकुंद गोसावी यांनी रक्तदान करून या शिबिरास प्रारंभ केला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, धरणगावचे पोलीस निरिक्षक राहूल खताळ, सपोनि गणेश बुवा, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचे विभाग प्रमुख डॉ. योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. यासोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही शिबिरांमध्ये एकूण सुमारे ९० पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.

मिनी फायर फायटरचे लोकार्पण

सायंकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून अग्नीशमन सेवा बळकटीकरणाच्या अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या आठ मिनी फायर फायटर्स वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. अनेकदा अरूंद गल्लीबोळांमध्ये आग लागली असता मोठे अग्नीशामक वाहने जाऊ शकत नसल्याने मोठी हानी होत असते. याची दखल घेऊन हे मिनी वाहने घेण्यात आले असून याचे प्रत्येकी मूल्य ३० लाख रूपये आहे. यासाठी डीपीडीसीमधून एकूण २ कोटी ४० लक्ष रूपयांचे तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पाळधी ग्रामपंचायतीने कचरा संकलनासाठी घेतलेल्या ट्रॅक्टरचे लोकार्पण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

सव्वा लाख वह्या वाटपाचा शुभारंभ

ना. गुलाबराव पाटील हे दरवर्षी स्वखर्चाने एक लाख वह्यांचे वाटप करत असतात. यंदापासून सव्वा लाख वह्या वाटप करण्यात येणार असून याचा शुभारंभ आज पाळधी येथे करण्यात आले. शाळा सुरू झाल्यानंतर गावोगावी प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना वह्या प्रदान करण्यात येणार आहेत. तर यंदापासून अनवाणी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना चपला आणि बुट देखील देण्यात येणार असून या उपक्रमासही आजपासून प्रारंभ करण्यात आला. तसेच यासोबत परिसरात ना. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

महापौरांतर्फे ‘विजयी गदा’ भेट

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शिवसेनेतर्फे ’विजयी गदा’ भेट देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाळधीला उसळली गर्दी

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यंदाच्या वाढदिवसाला जिल्हाभरातून हजारो आबालवृध्दांनी लावलेली हजेरी लक्षणीय ठरली. यामुळे पाळधी येथे दिवसभर मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले. यात विविध मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती देखील लक्षणीय प्रमाणात होती. अनेकांनी ना. पाटील यांना भेटवस्तू दिल्या. यात वृक्ष, पुस्तके, स्केचेस, पेंटींग आदींचा समावेश होता. दिवसभर शुभेच्छा स्वीकारल्यानंतर सायंकाळी पाळधी येथील मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्र्यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अतिशय अचूक आणि काटेकोर नियोजन करण्यात आले.

Protected Content