Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पनवेल वृत्तसंस्था । कोविड रूग्णांमध्ये वाढत होत असल्याने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसेच आणखी काही रुग्णालयांनाही कोविड रूग्णालयाचा दर्जा देण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले.

पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिलेल्या निवेदनानुसार पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. यावेळी या ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख सहभागी झाले होते.

पीएम केअर फंडातून आलेल्या वीस व्हेंटिलेटरपैकी दहा व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रूग्णालयास देण्यात आले आहेत. उर्वरित 10 व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, अशी कांतीलाल कडू यांची मागणी होती. त्या अनुषंगाने आदिती तटकरे यांनी हे व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, त्यासाठी लागणारा आवश्यक निधी तात्काळ देण्यात येईल, असे सांगितले.

खासगी डॉक्टर पुरेसे वेतन देऊन किंवा जाहिराती देऊनही प्रतिसाद देत नसल्याची खंत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अतिदक्षता विभाग चालविणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याबाबतची वस्तुस्थिती त्यांनी तटकरे यांच्याकडे मांडली. शिवाय खासगी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून स्वास्थ हॉस्पिटलने महापालिके विरुध्द न्यायालयात दावा दाखल केला असून या रुग्णालयाने महापालिकेकडे दरमहा 5 कोटी रूपये नुकसान भरपाई मागितली असल्याची माहिती त्यांनी यावेळी आदिती तटकरे यांना दिली.

Exit mobile version