Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर ग्रामीण रूग्णालयास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची अचानक भेट

पहूर , ता .जामनेर रविंद्र लाठे | कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पहूर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे यांची ही उपस्थिती होती.

दोन दिवसांपूर्वी अर्जून जाधव या प्राथमिक शिक्षकांचा मृत्यू झाला. आज (ता. ३ ) सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह महीनाभरात १२ जणांचा कोरानाने बळी घेतला असून बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाची नजर चुकवून शेतशिवारात लग्न सोहळे धूमधडाक्यात होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे उपलब्ध यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यात लसीकरणासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नाही. आज घडीला पहूर ग्रामीण रूग्णालयात २१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, पहूर ग्रामीण रुग्णालयात परमनंट डॉ. नियुक्त करण्याविषयी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी स्वतः नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पालकमंत्री या नात्याने पहूर गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून परिस्थिती जाणून घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ हर्षल चांदा, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, वैद्यकिय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही सुविधा मिळत नसल्याबद्दल माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, रवींद्र घोलप यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली. या वेळी सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे, शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे, ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे, रविंद्र लाठे, चेतन रोकडे यांच्यासह वैद्यकीय पथक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version