Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

४७ दिव्यांगांची माता : हर्षाली चौधरी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । स्वत:चा मुलगा दिव्यांग असल्यामुळे खचून न जाता अशाच तब्बल ४७ मुलांची माता बनलेल्या हर्षाली चौधरी यांची कथा ही प्रत्येकाला प्रेरणादायी ठरू शकते. आज मातृदिनानिमित्त लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने त्यांच्या वाटचालीचा उलगडून दाखवलेला हा आलेख. त्यांना बोलते केलेय मोनाली पालवे यांनी !

आजच्या युगातील आई ही स्मार्टफोनमध्येच गुंतलेली दिसते, आपला मौल्यवान वेळ मुलांसाठी न घालवता सोशल नेटवर्कमध्ये गुंतलेली असल्याची टीका नेहमी होत असते. यातच एक मुल सांभाळता सांभाळता नाकेनऊ येतात. मात्र एक नव्हे तर तब्बल ४७ त्यादेखील दिव्यांग मुलांचे संगोपन कुणी करू शकेल यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, जळगावातील रूशील फाऊंडेशनच्या उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हर्षाली चौधरी हेच काम करत आहेत. आज जागतिक मातृ दिनानिमित्ताने लाईव्ह ट्रेन्डस् ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी रूशिल मल्टीपर्पज फाऊंडेशन ची माहिती दिली.

हर्षाली चौधरी यांचा मुलगा रूशील हा दिव्यांग आहे. मात्र यामुळे खचून न जाता त्यांनी आपल्या मुलास जगातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. यासोबत त्याच्यासारख्याच मुलांनाही त्यांनी उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. दिव्यांग मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. अशा मुलांमध्ये असलेले गुण-कौशल ओळखून, त्यांच्यातील कलागुण जगासमोर आणून या दिव्यांग मुलांही सन्मानाने जगता यावे, यासाठी उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र यामुलांच्या पंखाना बळ देण्याचे कार्य करीत आहे.

रूशिल दिव्यांग असल्याचे दु:ख न मानता हर्षाली यांनी दिव्यांग मुलांना सामान्य जीवन जगता यावे, यासाठी त्या झटत आहेत. उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र मार्फत या मुलांना रोजगार मिळावा म्हणून दिवाळीच्या निमित्ताने दिवे रंगविणे, आकाश कंदील बनविणे, शो-पिस वस्तु, मिठाई बॉक्स, डायफूडसृ बॉक्स, इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांची फक्त आर्थिक परिस्थिती सुधारणे नव्हे, तर त्यांची शारिरिक, मानसिक व सामाजिक सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. म्हणून त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यांना सामाजातील लोकांशी ओळख तयार करण्याचे काम त्या करत आहेत. जेणेकरून त्या मुलांना आपण या जगात वेगळ असल्यासारखं वाटणार नाही. म्हणून एखादया दिवशी मॉल्समध्ये, चित्रपट पहायला किंवा हॉटेलसमध्ये घेवून जाणे असे त्या करतात. यामुळे मुलांमध्ये जनसंपर्क होऊन सामाजाशी जुळले गेल्यामुळे आपण ही सर्वसामान्य जीवन जगू शकतो असा आत्मविश्‍वास निर्माण होत असतो. या आत्मविश्‍वासाने जगण्याची एक नवी उमेद या मुलांमध्ये निर्माण करण्यात हर्षाली चौधरी यशस्वी झाल्या असल्यातरी त्या अजून ही समाधानी नाहीत. या मुलांसाठी खूप काही करणार असल्याचे त्यांनी या संवादात सांगितले. तसेच या मुलांना मदत करण्यासाठी इच्छूक असणार्‍यांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पहा : हर्षाली चौधरी यांची मुलाखत.

Exit mobile version