Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवरात्रोत्सवानिमित्त भव्य कन्यापूजन

फैजपूर प्रतिनिधी । गेल्या सहा वर्षापासून नियमित नवरात्रोत्सवात सुमारे १०० कन्यांचे पूजन श्री सतपंथ चारीटेबल ट्रस्ट संचलित श्री निष्कलंक धाम वढोदा प्र सावदा येथे आयोजित करण्यात आले होते.

यावर्षी मी महान आहे… या अलौकिक मंत्रासह असंख्य कन्यांचे पूजन सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा या संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. खेड्यापाड्यातील नटून थटून आलेल्या या बालिकांचे शिस्तीत प्रथम पाय धुऊन, पुसून स्वच्छ करण्यात आले. प्रत्येकीचे पूजन, औक्षण करून त्यांना स्टील जेवणाचा डबा, नेलपेंट, मेहंदी कोन, कानातील टॉप्स, चॉकलेट, मोबाईल स्टॅन्ड, चुंदडी, हात रुमाल, लिपस्टिक, टाल्कम पावडर, हेअर पिन यासह प्रत्येकीला मास्क व अकरा रुपये दक्षिणा देऊन पोटभर भोजन देण्यात आले.

यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, आजच्या कन्या याच उद्याच्या दुर्गा आहेत. त्यांचा सर्वांनी मान सन्मान, आदर राखून या कन्या भारताचे उज्वल भविष्य आहे. कन्या ही एका पिढीचा नव्हे तर दोन घराण्यांचा उद्धार करते. संपूर्ण विश्वामध्ये नवरात्र उत्सव ही एक पर्वणी असते. जप, तप, आदिमाया शक्तीच्या साधनेसाठी, कृपा प्रसादासाठी नवरात्रोत्सवात अष्टमी व नवमीला कन्या कुवारिका पुजन केले जाते. या कन्या प्रत्यक्ष, जिवंत स्वरूप या जगदंबा, दुर्गा आहे. ह्या प्रत्येक जीव निष्पाप, निष्कलंक आहे. या स्वरूपाला आदिमाया मानले जाते. या या पूजनाने आदिमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. या सर्व मुलींचे समाजात महत्त्व वाढावे व आपले महत्त्व कळावे, समाजात  मानसन्मान वाढावा, समाजाने यांच्याकडे श्रद्धेने, विश्वासाने, चांगल्या दृष्टीने समाजाने बघावे, मुलाप्रमाणे यांनाही तेवढेच महत्व द्यावे या उद्देशाने दरवर्षी श्री निष्कलंक धाम येथे कुमारिका पूजन करण्यात येते.

कोरोना परिस्थिती अभावी हा कार्यक्रम आटोपशीर घेण्यात येत आहे. मात्र या मुलींचा आत्मविश्वास वाढण्यासाठी व समाजात सर्वांचा सन्मान होण्यासाठी भविष्यात परिसरातील सर्व कन्यांचा मानसन्मान, पूजन करण्यात येईल असे महाराजांनी सांगितले. या कार्यक्रमाला श्री सतपंथ चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, पत्रकार व मुलींचे पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Exit mobile version