Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामसेवक ऑफीसच्या वेळात खेळतात बुध्दीबळ; गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा, वाकी आणि कोल्हाडी गावाचे ग्रामसेवक हे ऑफिसच्या कामा तहसील कार्यालयात बुध्दीबळाचे खेळ खेळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशा कामचुकार ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , बोदवड तालुक्यातील शिरसाळा, वाकी व कोल्हाडी गावाच्या विकासाची जबाबदारी करवते ग्रामसेवकावर आहे. परंतु हे ग्रामसेवक हे ग्रामपंचायतकडे दुर्लक्ष करून बोदवड येथील तहसील कार्यालयामध्ये ऑफिसच्या वेळेस  बुद्धिबळ गेम खेळतांनाचे व्हिडिओ फोटो नुकतेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे गावाकडे ग्रामसेवकांनी लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांची आहे. शिरसाळा गावांमध्ये शौचालय, गटारी नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.  बऱ्याच दिवसापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारीत फुटलेली आहे. परंतु ग्रामसेवकांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. गावातील लोक कामासाठी त्यांना फोन करतात. परंतु ते कोल्हाडीला असले तर शिरसाळाला आहे असे सांगतात आणि सिरसाळाला असले तर वाकीला असल्याचे सांगून कामे करण्यास टाळाटाळ करतात. कार्यालयीन वेळेत कधीच हजर राहत नाही आणि कार्यालयीन वेळेत बुद्धिबळ खेळतात. त्यामुळे संबंधित गट विकास अधिकारी व तहसीलदार यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.दरम्यान, या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Exit mobile version