Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे विकासाचे केंद्र : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी । ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे डांबरीकरण करणे यासाठी कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या वास्तू मोडकळीस आल्या असल्याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून २३ ग्रामपंचायतीत सुमारे ५ कोटी रूपयांच्या ग्रामपंचायतीची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. तर यंदा देखील अजून कामे मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदेच्या शाळेची सुरक्षा भिंत आणि व्यायाम शाळेतील अद्ययावत साहित्याचे लोकार्पण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या वास्तू मोडकळीस आल्या आहेत. या अनुषंगाने डी.पी.डी.सी. मधून पहिल्यांदाच ५  ग्राम सचिवालयांसाठी प्रत्येकी २५ लक्ष तर फर्निचरसह २२ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख अशा एकूण ४ कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून यातील काही ठिकाणचे काम पूर्ण झाले असून इतर ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यंदा देखील ग्रामपंचायत कार्यालयांसाठी भरीव कामे  करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. समग्र विकासासाठी आपण ग्रामपंचायतीला सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने  ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदेच्या शाळाचे वॉल कंपाऊंड आणि व्यायामशाळेतील आधुनीक सामग्री अशा सुमारे ५० लाख रूपयांच्या कामांचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोविडच्या नियमांचे पालन करून पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, सरपंच डॉ. विलास चव्हाण, उपसरपंच उमेश पाटील, उपसभापती पती प्रेमराज बापू पाटील,तालुका प्रमुख गजानन पाटील,डी. ओ. पाटील,  ग्रामसेवक संघटनेचे पंजाबराव पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील,  ग्रामपंचायत सदस्य भगिरथ डोळे, युवराज सोनवणे, सचिन पवार, सुधाकर पाटील, विभाग प्रमुख रविंद्र पाटील, पवन पाटील, चंदू भाटिया, बाळू पाटील, परिसरातील सरपंच नितीन पाटील, रविंद्र पाटील, अशोक पाटील, भैय्या पाटील, तुकाराम पाटील  यांच्यासह शिक्षक व कर्मचारी  उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मेडिकल ऑफिसर गिरीश चव्हाण, सरपंच डॉ. विलास चव्हाण, आरोग्य अधिकारी जगताप, आरोग्य सेवक कैलास पाटील, आरोग्य सेविका संगीता पवार, आशा स्वयंसेविका पूजा विसावे, रेखा दोडे, वंदना दोडे , मीना दोडे, ग्रामसेवक अनिल पाटील यांचा कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशही वाटप करण्यात आले.

सर्वसामान्यांचे आधारवड म्हणजे गुलाबभाऊ

यावेळी मान्यवरांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कार्यकर्ते व जनतेवर प्रेम करणारे असून  विकासकांची जाण असणारे  व विकास सम्राट आहे. “गुलाबभाऊ” म्हणजे सर्वसामान्यांचे आधारवड असल्याचे गौरवोद्गार मनोगतातून चांदसर सरपंच  सचिन पवार, आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जि. प.  सदस्य गोपाल चौधरी व तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र चव्हाण सर यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.

 

Exit mobile version