Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारचे घुमजाव : आता म्हणे आमदारांना घरे देण्याचा निर्णय झालाच नाही !

उस्मानाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदारांना घरे देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून प्रचंड टीका होत असतांना सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अशा प्रकारचा निर्णयच झाला नसल्याचे वक्तव्य आज केल्याने सरकार यावरून घुमजाव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यावरून प्रचंड टीका करण्यात येत आहे. सर्वसामान्यांनी याबाबत जोरदार टीका केली असून सोशल मीडियातून यावर मोठे चर्वण सुरू आहे. मात्र आता राज्य सरकारमधील महत्वाचे मंत्री असणारे अशोक चव्हाण यांनी या निर्णयबाबत घुमजाव केले आहे. राज्यातील आमदारांना मुंबईत घरे   देण्याचा निर्णय झालेला नाही. जो निर्णय झाला नाही, त्याची अंमलबजावणीही होणार नाही, आमदारांनी घरांची मागणी कधी केलीच नाही, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं.

उस्मानाबाद येथे दौर्‍यावर असतांना प्रसारमाध्यमांशी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, मुळात ३०० आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही. भाजपने या विरोधात केलेले आरोप चुकीचे आहे, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज उस्मानाबादेत तुळजापूरच्या देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ”आमदारांना घरे देण्याचा असा कुठलाही निर्णय झाल्याचं मला माहिती नाही. कुणाची मागणीच नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधकांनी यावरून उगाच आरोप केले आहेत. मात्र आमदारांना घरे देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही”. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने या निर्णयावरून घुमजाव केले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

Exit mobile version