Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यपालांनी राजकारणातील प्यादे होऊ नये ! : राऊत

मुंबई प्रतिनिधी | काल हायकोर्टाने दिलेल्या निकालावर अंमलबजावणीची अपेक्षा करत राज्यपालांनी राजकारणातील प्यादे होऊ नये असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले आहे.

कालच हायकोर्टाने बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत आपण राज्यपालांना निर्देश देऊ शकत नसले तरी त्यांनी याबाबतचा निर्णय लवकरच घ्यावा असे यावरील याचिकेच्या निकालात सांगितले आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी यावर आज भाष्य केले आहे. आज पत्रकारांशी बोलतांना राऊत म्हणाले की, राज्यपाल प्रेमळ आहेत. मी त्यांना ओळखतो. त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. पण ज्याप्रकारे १२ आमदारांसंदर्भात त्यांनी भूमिका घेतली आहे ती राजकीय आहे. ते मनापासून हे करत नसावेत. पण शेवटी त्यांची नेमणूक ज्या पक्षाकडून झाली आहे. त्या पक्षाच्या भूमिकेला. दबावाला अनुसरुन काम करत आहेत. खरं तर त्यांनी दबाव झुगारुन एक स्वाभिमामनी बाण्याचं, घटनेचे रखवालदार असल्याची भूमिका घेतली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, घटनात्मक पेचप्रसंग राज्यपालांकडून निर्माण होऊ नये असं कोर्टाने सांगितलं आहे. राज्यपालांनी स्वत:ला राजकीय प्यादं म्हणून वापरायला देऊ नये. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमची काही भूमिका किंवा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण घटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील तर हे या देशाच्या संघराज्यावर हल्ला आहे. काल त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे. कालचा हायकोर्टाचा निकाल गृहमंत्र्यांना समजला असेल. अमित शाह यांनी जसं ३७० कलम हटवत ऐतिहासिक कार्य करुन देशाची वाहवा मिळवली तसं महाराष्ट्रात या १२ आमदारांबाबत जी राजकीय बंदी घातली आहे. ती हटवली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version