Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

लखनऊ वृत्तसंस्था । मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन (वय ८५) यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते.

श्‍वासोच्छवास करताना त्रास होत असल्याने आणि ताप वाढल्याने लालजी टंडन यांना ११ जुलैला उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १३ जुलैला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काल रात्री उशिरा लालजी टंडन यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आशुतोष टंडन यांनी याबाबतची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली.

लालजी टंडन हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. ते १९७८-८४ या कालावधीत उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर १९९६ ते २००९ दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजपा युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. याशिवाय, लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

Exit mobile version