Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार भत्ता द्या : नाथाभाऊंची मागणी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून बेरोजगारांना प्रति महिना पाच हजार रूपये भत्ता द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत केली.

एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकीत प्रश्‍न उपस्थित केला. या संदर्भात ते म्हणाले की, “सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहे. रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कौशल्य विकास विभाग किंवा अन्य विभागांमार्फत बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी काही प्रक्रिया राबवणार का? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारले.

कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बेरोजगारांच्या नोंदणीबाबत सकारात्मक विचार करु असे उत्तर दिले. कौशल्य विकास विभागाने पोर्टल तयार केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते. तसेच विविध उद्योग-आस्थापने देखील तिथे नोंदणी करु शकतात असे सांगत बेरोजगारी भत्त्याचा विषय मात्र माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी माजी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी १ लाख युवकांना नोकऱ्या मिळवून देण्याचा संकल्प राबविला होता. त्याप्रमाणे कौशल विकास विभाग काही योजना राबविणार आहे का? तसेच एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये अनेक तरुण नोंदणी करतात. पण त्यांना कुणीही रोजगारासाठी बोलवत नाही. ही वस्तूस्थिती आहे. शासकीय कार्यालयामध्ये ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागेवर कंत्राटी कामगारांच्या ऐवजी शासकीय भरती करणार आहात का? असा प्रश्न सरकारला केला. तसेच खासगी कंपन्यांसाठीही काही नियम करुन एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, त्यांना प्राधान्याने नोकरी देणार का? शासन याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेणार आहे का? असा सवालही आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला.

Exit mobile version