Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. उन्मेष पाटलांची उद्यापासून ‘गिरणा परिक्रमा’

जळगाव प्रतिनिधी | गिरणा नदीपात्रातील बलून बंधार्‍यांना मान्यता मिळावी यासह अनधिकृत वाळू उपशाबाबत जनजागृती करण्यासाठी खासदार उन्मेष पाटील हे १ जानेवारीपासून ‘गिरणा परिक्रमा’ सुरू करत आहेत.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील युवा संवाद कार्यक्रमात खासदार उन्मेषदादा पाटील यांनी गिरणा परिक्रमाचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने गिरणा नदीवरील सात बलून बंधार्‍यांच्या कामासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून तत्काळ मंजुरी मिळावी व गिरणा नदीपात्रातील अनधिकृत वाळू उपशाच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी यासाठी खासदार उन्मेष पाटील हे १ जानेवारीपासून गिरणा परिक्रमा करणार आहेत. याच माध्यमातून गिरणा पुनरुज्जीवन अभियानही सुरू करण्यात येणार आहे.

खासदार उन्मेष पाटील हे प्रत्येक शनिवारी परिक्रमा काढणार आहेत. ८ जानेवारी रोजी मोहाडी, दापोरा, लमांजन, म्हसावद या गावांना भेटी देण्यात येणार आहे. तर पाचोरा, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातून पुन्हा एरंडोल, धरणगाव तालुक्यातून गिरणेचा संगम असलेल्या रामेश्वर येथे गिरणा परिक्रमेचा समारोप होणार आहे.

शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी कानळदा येथे सकाळी गिरणा परिक्रमेची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला जलपुरूष राजेंद्र सिंह, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, पाशा पटेल, आ. राजूमामा भोळे यांची उपस्थिती राहणार आहे. पहिल्या दिवशी खासदार उन्मेष पाटील हे फुपनगरी, वडनगरी, खेडी व आव्हाणे, निमखेडी या गावांलगत जनजागृती करीत पायी प्रवास करतील. यानंतर दुपारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह, पाशा पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी महेश सुदळकर, तहसीलदार नामदेव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version