Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वकील प्रविण चव्हाण यांच्या विरोधात गिरीश महाजन यांची पोलीसात तक्रार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटलेले आहे. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचा याप्रकरणात राजीनामाही घेण्यात आला आहे. आता चव्हाणांविरूध्द माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी थेट पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे प्रविण चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना पोलीसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

 

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणात चव्हाण यांच्या चौकशीची या लेखी तक्रारमध्ये मागणी केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी महाजन यांचा लेखी अर्ज सीआयडीकडे दिला आहे.

 

गेल्या काही दिवसांपुर्वी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्हच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आणून मोठा खुलासा केला होता. यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना विविध गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याच आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यात राज्यातील विरोधाकांना देखील अडकविण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. याचे पुरावे म्हणून फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्षांकडे पेनड्राईव्हही देण्यात आले होते. या पेनड्राईव्हमध्ये तब्बल १२५ तासांचा डाटामध्ये पुरावे असल्याचा दावा केला होता.

 

यासंदर्भात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पुणे येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.

 

Exit mobile version