‘मिशन राज्यसभा’ ! : आ. गिरीश महाजनांवर महत्वाची जबाबदारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभा निवडणूक अतिशय चुरशीच्या टप्प्यात पोहचली असतांना भाजपचे संकटमोचक म्हणून समजले जाणारे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपविल्याचे दिसून आले आहे.

सध्या राज्यसभा निवडणुकीची धामधुम सुरू असून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात यासाठी काटे की टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष करून सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये तगडी फाईट होणार असून यातील निकाल हा राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणार असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष या दोन्हींकडे अतिरिक्त मते असली तरी लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांवर संपूर्ण मदार असल्याचे दिसून आले आहे. यामुळे दोन्ही बाजूंकडून अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

या पार्श्‍वभूमिवर, भारतीय जनता पक्षाने लहान पक्ष आणि अपक्षांशी बोलणी करण्यासाठी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी टाकल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या आघाडीकडे तीन मते असून ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. काल रात्री उशीरा आमदार महाजन यांनी वसई येथे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. बहुजन विकास आघाडीची मते ही भाजपला मिळण्याबाबत त्यांनी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही तीन मते भाजपलाच मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. यासोबत आमदार गिरीश महाजन हे अन्य अपक्षांच्याही संपर्कात असल्याचे वृत्त आहे. या माध्यमातून ते भाजपसाठी पाठींबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. याला कितपत यश लाभणार हे राज्यसभा निवडणुकीच्या निकालातूनच समजणार आहे.

Protected Content