Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरीशभाऊ ‘ग्राऊंड झीरो’वर : महापुरग्रस्तांच्या मदतीला घेतली धाव !

महाड | अतिवृष्टीमुळे दरड कोसळून हाहाकार उडालेल्या तळिये गावात आज आमदार गिरीश महाजन यांनी प्रशासकीय मदत पोहचण्याच्या आधीच पोहचून लोकांना मदत सुरू केली आहे. तर, ”आम्ही मुंबईवरून येथे येऊ शकतो, मात्र स्थानिक प्रशासन अजूनही पोहचले का नाही ?’ असा प्रश्‍न विचारत आ. महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

महाड तालुक्यातील तळिये या गावात दरड कोसळून यात ७० पेक्षा जास्त जण दाबले गेल्याची भिती आहेत. यात ३६ मृतदेह आढळून आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याची माहिती मिळताच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार गिरीश महाजन हे मुंबईवरून आपदग्रस्तांच्या भेटीसाठी निघाले.

रस्त्यात अनेक अडचणी आल्या तरी आज पहाटे आ. महाजन, आ. दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे, हे तळिये गावात पोहचले. यासाठी ते तीन ते चार किलोमीटर पायी चालले. ते पोहचल्यानंतर अक्षरश: हाहाकार उडाल्याचे त्यांना दिसून आले. तळिये गावातील बहुतांश घरांवर दरड कोसळल्याने याचे अस्तित्व नाहीसे झाल्याचे त्यांना दिसून आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते व आ. गिरीश महाजन हे तळिये येथे पोहचले असतांनाही स्थानिक प्रशासन मात्र ढिम्म होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास एनडीआरएफचे पथक आले. यानंतर येथे मदतकार्य सुरू करण्यात आले.

कोल्हापूर येथे २०१९ साली महापूर आल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी प्राणाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली होती. यानंतर आज प्रशासनाची मदत पोहचण्याच्या आधीच तळिये गावात पोहचून त्यांनी तेथे ठाण मांडले आहे. दरम्यान, या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना आ. गिरीश महाजन म्हणाले की, मी प्रदीर्घ काळापासून राजकारणात असलो तरी इतकी भयंकर दुर्घटना कधी पाहिली नाही. येथे तळिये गावाचे अस्तित्वच पुसले गेले आहे. हे गाव महाडपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असले तरी दुर्घटना घडून गेल्यानंतर तब्बल २२ तासांपर्यंत कुणी येथे पोहचू नये ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. आम्ही मुंबईवरून येथे अनेक अडचणींवर मात करून पोहचले. मात्र स्थानिक प्रशासन झोपले आहे. आम्ही महाड शहरात देखील मदत केली. यानंतर तेथून येथे येण्यासाठी अनेक ठिकाणी थांबावे लागले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी असल्याने थांबलो. मात्र आम्ही थेट दुर्घटनेच्या ठिकाणी पोहचून मदत सुरू केली आहे. तर, राज्य सरकार मात्र अद्यापही झोपेतच असल्याची टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली.

Exit mobile version