Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजस्थानात राजकीय भूकंप : गेहलोत समर्थक आमदारांचे राजीनामे

जयपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजस्थान विधानसभेतील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी आपापले राजीनामे विधानसभाध्यक्षांकडे सोपविल्याने तेथे राजकीय संकट निर्माण झाले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असून यामुळे एक मंत्री एक पद या धोरणानुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र त्यांच्या ऐवजी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास गेहलोत समर्थकांनी साफ नकार देत बंडाचे निशाण फडकावले आहे. या अनुषंगाने रात्री उशीरा विधानसभेतील ८० पेक्षा जास्त आमदारांनी आपापल्या पदांचे राजीनामे विधानसभाध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे सोपविले आहेत. यामुळे राजस्थानमध्ये राजकीय संकट ओढावले असल्याचे दिसून आले आहे.

काल रात्री उशीरा गेहलोत समर्थक आमदार बसेसमधून विधानसभेत गेले. तेथे त्यांनी आपले राजीनामे सादर केले. सूत्रांच्या माहितीनुसार ८२ आमदारांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडालेली आहे. यातून अशोक गेहलोत हे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी आपल्या समर्थकालाच ते राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले आहे.

राजस्थान विधानसभेत १०८ आमदार असून यातील ८२ आमदारांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्यामुळे सचिन पायलट यांना प्रखर विरोध होत असल्याचेही अधोरेखीत झाले आहे. यामुळे आता पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version