Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा प्रतिनिधी । यंदाचा गणेशोत्सव कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे मार्गदर्शक सुचना असलेले शासन परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

परिपत्रकानुसार, सार्वजनिक गणपतीसाठी गणेश मंडळाने स्थानिक प्रशासनाची परवानगी घेवूनच गणेश मंडळाची स्थापना करावी. गणेश मंडळाने परवानगी घेताना खाजगी जागेतच गणपती बसविण्यासाठी परवानगी घ्यावी. विनापरवानगी गणेश मंडळाची स्थापना करण्यात येवू नये.

गणेश उत्सवात  श्रीगणेशाची शाळूची किंवा पर्यावरण पूरक मुर्ती बसविणे, सार्वजनिक मंडळाकरीता 4 फुट व घरगुतीसाठी 2 फुट उंचीच्या मर्यादेत असावी. तसेच विसर्जन घरच्या घरी करावे, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून कोरोना संसर्गापासून संरक्षण करावे. उत्सवाकरीता देणगी दिल्यास त्याचा स्वीकार करून जाहीरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची, थर्मल स्कॅनिंगची पर्याप्त व्यवस्था करावी. दर्शन घेवू इच्छिणाऱ्या भाविकांनी सामाजिक अंतर ठेवावे. मास्क, सॅनीटायझरचा वापर करावा.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येवू नये. तसेच आगमन व विसर्जनवेळी 5 लोकांची उपस्थिती ठेवावी. विसर्जनचेळी पारंपारीत पद्धतीने होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमी वेळ थांबावे. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. एकत्रित गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येवू नये. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमाकरिता गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटोकोरपणे पालन करण्यात यावे. आरतीच्या वेळी किंवा  दर्शनाच्या वेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. आरतीची वेळ सकाळी 7 ते 9 व सायं 7 ते 9 दरम्यान राहील याची गणेश मंडळाने खबरदारी घ्यावी. आवश्यकतेनुसार दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट याद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे. गणेश विसर्जन करण्यासाठी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने शहरी भागात मुख्याधिकारी नगर पालिका यांनी गणेश मुर्तीचे संकलन करण्यासाठी स्थळ निश्चित करून नगर पालिकेचे वाहन प्रभाग निहाय उपलब्ध ठेवावे, तसेच गणेश विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करून त्या ठिकाणी सर्व सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन करावे. विसर्जन मार्गावर व गणेश मंडळाच्या परिसरात उघड्यावर मांस विक्री होणार नाही. मोकाट जनावरांचा बंदोबस्त होईल, याची  खबरदारी घ्यावी.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उत्सव सार्वजनिक न करता घरगुती पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

Exit mobile version