Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचा निकाल घोषित

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त दोन गटात स्वातंत्र्य सैनिकांच्या समरगाथाया विषयावर राष्ट्रीय पातळीवरील नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून यात जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल शालेय गटातून तर महाविद्यालयीन गटात एम.जे. कॉलेज संघाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

“स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक या महनीय नेत्यांबरोबरच त्या त्या जिल्ह्यातील क्रांतिकारक, पत्रकार, नाट्यक्षेत्रातील कलाकार, साहित्यिक, नाटककार यांचे देखील अनन्य साधारण योगदान राहिले आहे. स्वातंत्र्य तर मिळाले परंतु स्वराज्याला सुराज्य निर्माण करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे.” असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुळकर्णी यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय नाटिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ५ वी ते १० वी असा पहिला व ११ ते पद्युत्तर दुसरा अशा दोन गटात स्वातंत्र्य सैनिकांच्या समरगाथाराष्ट्रीय पातळीवरील नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यात शालेय गटातून जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलने पहिला तर महाविद्यालयीन गटात जळगावच्याच मूळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पुरस्कार मिळविला. या स्पर्धेसाठी मध्यप्रदेश, गुजरात,  हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब या राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे, सुबोध सराफ आणि तुमची मुलगी काय करते या दूरदर्शन मालिकेतील कलाकार हर्षल पाटील हे होते. पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय गिरीश कुळकर्णी यांनी करून दिला. ऑनलाईन वेबिनारचे संचालन डॉ. आश्विन झाला यांनी केले सूत्रसंचालन केले तर सी.डी. पाटील यांनी आभारप्रदर्शन केले..

स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे –

शालेय गट- १ : इ. ५ वी ते १० वी यातील विजेत्यांमध्ये – विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूल (प्रथम) विरार मुंबई येथील श्रीमती तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएससी स्कूल (द्वितीय), चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय पुणे (तृतिय), भोपाळ येथील सागर पब्लिक स्कूल (उत्तेजनार्थ) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

 

महाविद्यालय गटातील विजेत्यांमध्ये – मूळजी जेठा महाविद्यालय (प्रथम) कुरूक्षेत्र युनिर्व्हसिटी सोनिपत हरियाणा (द्वितीय), जी.एस. कॉलेज ऑफ वर्धा (तृतिय) असे पुरस्कार घोषित करण्यात आले.

 

स्पर्धेचा निकाल गांधी रिसर्च फाउंडेशनची वेबसाइट www.gandhifoundation.net प्रस्तुत लिंकवर जाऊन बघू शकतात. असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे.

Exit mobile version