Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग. स. सोसायटी निवडणुकीच्या हालचालीस प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी | सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ग.स. सोसायटीचा कालावधी संपला असला तरी अद्यापही निवडणुकीच्या हालचाली दिसून येत नव्हत्या. आता मात्र या संदर्भात लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत ग. स. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाजाला गती आली आहे. संस्थेकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे मतदार याद्या सादर करण्यात आल्या असून, दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे हरकती मागवून त्यावर निर्णय देण्यासह निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती व कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मार्चअखेर निवडणूक होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मतदारांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यादी प्राप्त झाली आहे. दोन दिवसांत जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई मतदार यादी प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठ दिवसांत हरकती मागवल्या जातील. यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीचा ३० दिवसांचा तर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदान होईपर्यंत ४० दिवसांचा असा एकूण दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Exit mobile version