Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : गुलाबराव पाटील

नाशिक – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सप्तशृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव आहे. गडावर दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकही वास्तव्यास आहे. त्यामुळे सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, नाशिक च्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत सप्तशृंगी गडावर ९ कोटी २३ लाखांच्या  नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, नितीन पवार, सरपंच रमेश पवार, उपसरपंच मनिषा गवळी पाणी पुरवठा विभागाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे,  तहसीलदार बंडू कापसे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, संदीप बेनके आदी मान्यवर उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “सप्तश्रृंगी गड संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या ठिकाणी दररोज ७५ हजार नागरिक असतील आशा अंदाजाने ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून यात्रा उत्सवांचाही विचार करण्यात आला आहे. या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून अडीच लाख लिटरचा जलकुंभ, दिवसाला २२ लाख लीटर शुद्ध पाणी होईल असा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे.  भवानी पाझर तलावाच्या माध्यमातून येथे काम करण्यात येणार आहे. सिमेंट बंधारा, सुर्यकुंड व गंगा जमुना विहीरिचाही वापर या योजनेसाठी करण्यात येणार आहे. तसेच वीज बिलाची समस्या निर्माण होवू नये यासाठी सोलर प्रणालीचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाड्यांना मिळणार पाणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाड्या व पाड्याना नळाद्वारे पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे.  नाशिक जिल्ह्यासाठी  तरतूद करण्यात आली आहे. तसेच गावात पाणी पुरवठा योजना राबवितांना सोलर प्रणालीचा समावेश करावा,  असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

अठ्ठावीस हजार गावांना नळाद्वारे पाणी पोहचविणार

“पाणीदार नेता म्हणून ओळख असलेल्या स्वर्गीय ए. टी. पवार यांच्या मतदारसंघात पाण्यासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही. तसेच पाणी जात,धर्म व पंथ मानत नाही त्यामुळे दुरुस्ती करिता अडीच कोटी रुपये मंजूर झालेली पहिली योजना आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, नाशिक जलजीवन मिशन योजना एक क्रांती घडवून आणणारी योजना आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात २८ हजार गावांना नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. त्यानुसार डीपीआर तयार करण्यात आले असून पहिल्या टप्यातील कार्यारंभ जुलै पर्यंत देण्यात येणार आहे, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरें याच्या वतीनेही सप्तश्रृंगी गडाचा पर्यटन दृष्टीने विकास साधण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येईल.” असेही ना.गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

आमदार नितीन पवार म्हणाले की, “नाशिकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने जलजीवन मिशन अंतर्गत सप्तशृंगी गड येथे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ९ कोटी २३ लाखांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. सदरची योजना तीन महिन्यात मंजुर करण्यात आली असून कळवण व सुरगाणा मतदारसंघासाठी एकूण १६४ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे.”  अशी माहिती आमदार  नितीन पवार यांनी यावेळी दिली.

Exit mobile version