Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खंडणी प्रकरणातील फरार संशयित आरोपीला पुण्यातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार तेजस रवींद्र मोरे (वय-३४, रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पूत्र व अन्य तीन अशा पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित निखिल आळंदे या संशयिताला पुण्यातून एलसीबीच्या पथकाने अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेन ड्राईव्ह प्रकरणात अडचणीत आलेले ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात या पूर्वीच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तेजस मोरे हे साक्षीदार असून त्यात त्यांचा जबाबदेखील झाला आहे. १६ नोव्हेंबर रोजी मोरे हे रात्री जळगावातील घरासमोर शतपावली करीत असताना चार जण त्यांच्याजवळ आले व चार कोटी आताच दे, नाही तर तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली होती. मोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, त्यांचा मुलगा चिन्मय प्रवीण चव्हाण यांच्यासह विलास शांताराम आळंदे, निखिल विलास आळंदे, स्वप्निल विलास आळंदे या पाच जणांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित निखिल विलास आळंदे हा पुण्यात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. पथकाने पुण्यातील एका बांधकाम साईटवरुन निखीलला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

Exit mobile version