Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिस ( Combined Defence Service – CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी दिनांक १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत सी.डी.एस (CDS) कोर्स क्र. ६२ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

जळगाव शहर व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,‌जळगाव येथे दि.२९ जानेवारी २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सी.डी.एस-६२ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सी.डी.एस कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावे.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.उमेदवार लोकसंघ आयोग (upsc) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सि.डी.एस परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा हॉट्सअप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार यांनी केले आहे.

Exit mobile version