Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केवायसीच्या नावाखाली सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । बीएसएनचे कनेक्शन बंद होत असल्याने केवायसी करावी लागणार. तसेच त्यासाठी क्विक सपोर्ट ऍप डाऊनलोड करण्यास सांगून सेवानिवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यातून ९ लाख ९० हजार रुपयात परस्पर वळवून घेतल्याची घटना उघडकीला आली आहे.  याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बी. जे. नगरातील सेवानिवृत्त शिक्षक विनोद गेंदालाल कोचुरे (वय-६०) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांना दोन अज्ञात क्रमांकावरुन त्यांना फोन आला. यावेळी त्याने विनोद कोचुरे यांना तुमचे बीएसएनएल कनेक्शन बंद होत आहे. ते कनेक्शन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागेल असे सांगत त्यांचा विश्‍वास संपादन केला. तसेच त्यासाठी तुम्हाला दहा रुपयांचा रिचार्ज करणे गरजेचे आहे असे देखील त्यांनी विनोद कोचुरे यांना सांगितले.

फोन करणार्‍याने विनोद कोचुरे यांना त्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरुन बीएसएनएल केवायसी क्विक सपोर्ट नावाचे ऍप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी हे ऍप डाऊनलोड करताच संबधिताचे त्यांच्या मोबाईलचा ऍक्सेस घेवून त्यांच्या एसबीआयच्या बँक खात्यातील ९ लाख ९० हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहे.

 

Exit mobile version