लिंबू खरेदीत अपहार : अधिकारी निलंबीत

चंदीगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लिंबूचे मूल्य वाढल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात लिंबू-सरबत महागले असतांनाच आता पंजाबमध्ये लिंबू खरेदीत अपहार केल्या प्रकरणी एका अधिकार्‍याला निलंबीत करण्यात आले आहे.

सध्या लिंबूचे मूल्य वाढल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहेत. यातच कपूरथळा येथील कारागृह निरिक्षकांने लिंबू खरेदीत घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. कारागृहातील कैद्यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आल्यामुळे कपूरथळा मॉडर्न कारागृहाचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे.

तुरुंगातील कैद्यांकडून तक्रार आली की तुरुंग अधीक्षक बनावट रेशन बिले वाढवत आहेत आणि बिलांमध्ये दर्शविलेल्या वस्तू तुरुंगातील कैद्यांना कधीही दिल्या जात नाहीत. त्यानंतर सरकारने तपासणी केली असता सत्य समोर आले. लाल यांनी गेल्या १५ ते ३० एप्रिलच्या कालावधीत सुमारे ५० किलो लिंबू २०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केल्याचे प्रशासनाला आढळून आले. मात्र कैद्यांना कधीही लिंबू देण्यात आले नाही. याची दखल घेऊन पंजाबचे तुरुंग, खाण आणि पर्यटन मंत्री हरजोतसिंग बैंस यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे.

तुरुंगातील कैद्यांनीही अधिकार्‍यांना सांगितले होते की, त्यांना कधीही लिंबू दिले गेले नाहीत. रेशन आणि भाजीपाला साठ्याच्या चौकशीमध्येही अनियमितता उघडकीस आली. या चौकशीत भाजीपाला आणि गव्हाचे पीठ खरेदी घोटाळ्याचेही संकेत मिळाले आहेत. कैद्यांना दिले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे होते आणि ते तुरुंगाच्या नियमावलीत नमूद केलेल्या प्रमाणाशी जुळत नसल्याचा शेरा लेखा अधिकार्‍यानं आपल्या अहवालात दिला आहे. यानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Protected Content