Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापुरात ४० जण मृत्यूमुखी ; दोघे बेपत्ता

kolhapur new

पुणे, वृत्तसेवा | कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे तर २ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुरामुळे सांगलीत १९, कोल्हापुरात ६, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी ७ आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात प्रत्येकी एक असे तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच ब्रह्मणाळमध्ये आज ५ मृतदेह सापडल्याचं दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ जणांचं स्थलांतर करण्यात आलं असून सांगलीत ४ लाख ४१ हजार ८४५ जणांचं स्थलांतर करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी ५६ फुटावरून ५३ फुटावर आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात एकूण ५० गाई, ४२ म्हशी, २३ वासरं, ५८ शेळ्या ११ हजार १०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून एकूण २५ लाख १७ हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक ७८७५७६९१०३ व सांगली जिल्ह्यासाठी ७८७५७६९४४९ हा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version