Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाँब स्फोट प्रकरणात चौघांना फाशीची शिक्षा

पाटणा वृत्तसंस्था । २०१३ मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात  रॅलीच्या दरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए न्यायालयाने आज चार दोषींना फाशीची, दोघांना जन्मठेपेची, दोघांना १० वर्षांची आणि एकाला ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर एका आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आले.

बिहराच्या पाटणा येथील गांधी मैदानावर २७ ऑक्टोबर २०१३ रोजी झालेल्या भाजपच्या हुंकार रॅलीचे प्रमुख वक्ते नरेंद्र मोदी, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. या सभेदरम्यान पक्षाचे इतर मोठे नेतेही उपस्थित होते. यावेळी मैदानात बॉम्बस्फोटांची मालिका घडली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. हैदर अली आणि मुजिबुल्ला हे गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. एनआयएने आरोपींना अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता इम्तियाजने अनेक नावे पुढे केली. त्यानंतर तपास यंत्रणेने बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाइंडसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले होेते.

यामध्ये या प्रकरणी एनआयएने ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यापैकी एका आरोपीचे वय कमी असल्याने हा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार उर्वरित दहा आरोपींविरुद्ध एनआयए न्यायालयात खटला सुरू होता.

एनआयएचे विशेष न्यायाधीश गुरविंदर मल्होत्रा यांनी इम्तियाज अन्सारी, मुजिबुल्ला, हैदर अली, फिरोज अस्लम, नोमन अन्सारी, इफ्तिखार, अहमद हुसैन, उमर सिद्दीकी आणि अझरुद्दीन यांना २०१३ च्या गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवले. तर फखरुद्दीनला पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आले.

 

Exit mobile version