Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रकाश आंबेडकरांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सोडणार प्रत्येकी चार-चार जागा

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये प्रत्येकी 20-20 जागा लढवण्यावर जवळपास एकमत झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्याचवेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आठ जागा देण्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीने नक्की केल्याचे कळले आहे. त्यानुसार काँग्रेस चार जागा आणि राष्ट्रवादिने चार जागा सोडण्याची तयारी दाखवली असल्याचे वृत्त आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास त्यांच्या किमान सहा जागा निवडून येण्याचा अंदाज आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे २० जागांची मागणी केली आहे. गेल्या निवडणुकांत काँगेस २७ तर राष्ट्रवादी २१ जागांवर लढली होती. महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, दलित, बहुजन, मुस्लिम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरू शकतो, याची पुरेपूर कल्पना आंबेडकर यांना आहे.

म्हणूनच तर सोमवारी त्यांनी राज्यातील 48 मतदारसंघांत आपण स्वतंत्र उमेदवार देऊ, असं जाहीर केलं होतं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नाही. काँग्रेसकडे चांगला चेहराच नाही. मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही, अशी टीकाही काँग्रेसवर केली होती.

Exit mobile version