Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । आता वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध करण्यात आली आहे.                           

सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये  रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकही नमूद आहे.  रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल  अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येईल.

महावितरण मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘सबमीट मीटर  रीडिंग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रीडिंग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्ल्यूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मॅन्युअली रीडिंग  अ‍ॅपमध्ये नमूद करावे व सबमिट करावे. मोबाईल  अ‍ॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमिट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना http://www.mahadiscom.in या वेबसाईटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे.

स्वतःहून मीटर रीडिंग घेण्याचे फायदे अनेक 

प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रीडिंग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास अनेक फायदे होणार आहेत. स्वतःच्या मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावरही नियंत्रण राहील. रीडिंगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. या व इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

Exit mobile version